- फ्रोजन शोल्डरची कारणे कोणती?
– खांद्याच्या बॉल आणि सॉकेट वर एक आवरण असते (कॅप्सुल),जे पातळ आणि सैल असते , फ्रोझन शोल्डर मध्ये याला सूज येऊन याचे आकुंचन होते , त्यामुळे हालचाली करायला त्रास होतो .फ्रोजन शोल्डर होण्यामागे कोणतेही नेमके कारण नाही. 45 वयापुढील व्यक्तींमध्ये,खांद्याला दुखापत झाल्यास ,किंवा ज्या लोकांना मधुमेह,हृदयाशी निगडीत समस्या,थायरॉईडच्या समस्या आहेत त्यांना फ्रोजन शोल्डर होण्याची शक्यता अधिक असते.
- फ्रोजन शोल्डरचे तीन टप्पे कोणते?
– पहिल्या टप्प्यात खांद्यांना अत्यंत वेदना होत असतात.या वेदना 2 ते 3 महिन्यांपर्यंत होऊ शकतात.दुसर्या टप्प्यात खांद्यांच्या वेदना कमी होऊन पुढील 2 ते 3 महिने खांदे आखडून बसू शकतात.तिसरा टप्पा हा रेझोल्यूशन चा असतो , ज्या मध्ये, खांदा हळूहळू मोकळा होऊ लागतो व वेदना कमी होऊ लागतात.हा त्रास दीड ते दोन वर्षापर्यंत राहू शकतो. वेदना सुरु झाल्यास किंवा लक्षणे दिसल्यास रूग्णाने लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- फ्रोजन शोल्डरवर उपचार कोणते ?
– फ्रोजन शोल्डरच्या योग्य निदानानंतर उपचारपध्दतींमध्ये प्राथमिक अवस्थेत , काही औषधे व फिजिओथेरपी , ह्या उपचारपध्दतीने 90 टक्के रूग्ण बरे होतात.मात्र काही रूग्णामध्ये फ्रोजन शोल्डरची समस्या अधिक असेल तर अशा साधारण 10 टक्के रूग्णां मध्ये ’हायड्रो डायलेटेशन’ ही प्रक्रिया करावी लागते.ज्यामध्ये खांद्यामध्ये भूल देऊन खांद्यात एक इंजेक्शन दिले जाते. हायड्रोडायलेटेशन अतिशय परिणामकारक उपचार पद्धती आहे.
रूग्ण फिजिओथेरपी किंवा हायड्रोडायलेटेशन प्रक्रियेने ठीक होत नसतील,तर त्यांना ’आर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया’ करण्याचा सल्ला दिला जातो.ही शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साहाय्याने केली जाते.यात रूग्णाला हॉस्पिटलमध्ये एक दिवसाकरिता अॅडमिट व्हावे लागते.खांद्याला एक किंवा दोन टाके घातले जातात.आर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया हे एक प्रगत तंत्रज्ञान असून यात रुग्ण लवकर बरा होतो आणि खांद्यांच्या वेदना व आखडणे कमी होण्यास मदत होते . रुग्ण लवकरात लवकर आपली नेहमीची कामे सुरू करू शकतात.
– डॉ.अभय कुलकर्णी,
स्पेशालिस्ट आर्थोपेडिक सर्जन, सह्याद्रि हॉस्पिटल्स.